जालना-वडीगोद्री महामार्गावर बस व मोटार सायकलचा अपघात; दोन ठार तर दोन गंभीर जखमी

34

जालना । प्रतिनिधी – जालना-वडीगोद्री महामार्गावर अंबड पासून 5 किमी अंतरावर असणार्‍या रामनगर पाटीजवळ जालना येथून बीडकडे जाणार्‍या एस टी बसने 2 वेगवेगळ्या मोटार सायकल स्वाराला उडविल्याने भीषण अपघात घडला आहे. या अपघातात राजू भोईटे (वय 32 वर्ष रा. झिरपी ता. अंबड), लक्ष्मण वसंत घांडगे (वय 20 वर्ष रा. कासारवाडी ता. अंबड ) हे 2 जण जागीच ठार झाले आहेत. तर रोहिदास बर्डे (रा. सोनक पिंपळगाव ता. अंबड) व शिला भोईटे (रा. झिरपी ता.अंबड) हे दोघे गंभीररित्या जखमी झाले. जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय अंबड येथे दाखल करण्यात आले आहे. घटनेची मिळालेली माहिती अशी की, अंबड येथून बीड कडे जाण्यासाठी निघालेली जालना बीड ही बीड आगाराची निमआराम बस क्र. एम.एच.20 बी.एल. 3632 या बसने अंबड कडे जाणार्‍या मोटार सायकल क्र.एम.एच. 21 बी.यु.8392 वरून जाणार्‍या डबल सीट जाणार्‍या युवकाला समोरून उडविले. व बसचे नियंत्रण सुटल्याने पुन्हा समोरून आलेल्या दुसर्‍या मोटार सायकलला उडविल्याने अपघात घडला आहे. या विचित्र अपघातात 2 जण जागीच ठार झाले असून 2 गंभीर जखमी झाले आहेत. बसचा वेग जास्त असल्याने बस रोडच्या लगत असलेल्या खड्यात जाऊन पडली. जखमींना उपचारार्थ उपजिल्हा रुग्णालय अंबड येथे पाठविण्यात आले आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक साजिद, पोलीस उपनिरीक्षक ढाकणे, पोलीस कर्मचारी दीपक पाटील, स्वप्नील भिसे, सतीश देशमुख आदींनी तातडीने घटनास्थळ गाठून जखमींना अंबड उपजिल्हा रुग्णालयात हलविले आहे.