शासकीय गुत्तेदार एम.पी. पवार यांचा मृतदेह घाणेवाडी जलाशयात आढळल्याने खळबळ आत्महत्या की घातपात अद्याप अस्पष्टता; पोलीसांचा तपास सुरू

129

जालना । प्रतिनिधी – येथील शासकीय कॉन्ट्रॅक्टर एम.पी. उर्फ मधुकर पवार (वय 51) यांचा मृतदेह घाणेवाडी जलाशयात आढळल्याने जालन्यात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, एम.पी. पवार यांनी आत्महत्या केली की घातपात याबाबत अद्याप स्पष्टता नसून प्रथमदर्शनी त्यांनी आत्महत्त्या केल्याचे बोलल्या जात आहे.
एम. पी.पवार हे मंगळवार (दि. 14) रोजी सांयकाळी 5 वाजेच्या सुमारास मोबाईल व खिशातील सामान काढून ठेवून घरातून बाहेर पडले. त्यांच्या परिवारासह मित्रांनी रात्रभर त्यांचा शोध घेतला. मात्र, ते कुठेही मिळून आले नाही. त्यानंतर त्यांचे भाऊ रामेश्वर पवार यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार बुधवार (दि 15) रोजी सकाळी कदीम जालना पोलीस ठाण्यात मिसिंगची नोंद करण्यात घेण्यात आली होती. दरम्यान, आज दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घाणेवाडी येथील जलाशयात काही नागरिकांना एक बेवारस मोटार सायकल व मृतदेह तरंगताना आढळून आला. नागरिकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली.
घटनेची माहिती मिळताच चंदनझिरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, मृतदेह अग्निशामक दल व नागरिकांच्या मदतीने जलाशयातून बाहेर काढला. यावेळी मृतदेहाजवळ एक विषारी औषधाची बाटली आढळून आली असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केला आहे. घटनेची माहिती शहरात पसरल्यानंतर जिल्हा रुग्णालयात नागरिकांनी गर्दी केली होती. मृत्यूचे नेमके कारण काय हे समोर आले नाही. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच खरे कारण काय ते समोर येईल. दरम्यान, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.