स्तन कर्करोगाचे जागवू भान, योग्य उपचार व वेळेत निदान

15

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या वतीने राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली महिला दिनाचे औचित्य साधून स्तन कर्करोग जनजागृती व उपचार अभियान हाती घेण्यात आले आहे. संपूर्ण राज्यभरात सर्व वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पुढील वर्षभर दर बुधवारी हे अभियान राबवण्यात येणार आहे. या शिबिरामुळे स्तन कर्करोगाचे शीघ्र निदान करता येईल. तसेच रोग निदान झालेल्या रूग्णांना तात्काळ पुढील सर्वसमावेशक उपचार तातडीने देता येतील व यातून होणाऱ्या जीवितहानीस प्रतिबंध करता येईल. या शिबिराच्या निमित्ताने स्तन कर्करोग व या मोहिमेचा आढावा घेणारा विशेष लेख.

स्तनाचा कर्करोग हा महिलांमध्ये सर्वाधिक प्रमाणात आढळणारा कर्करोग आहे. मात्र, स्तनाच्या कर्करोगाचा धोका केवळ महिलांमध्येच नाही तर काही प्रमाणात पुरुषांमध्येही असतो. स्तनाचा कर्करोग हा शरीराच्या इतर भागात झपाट्याने पसरतो, म्हणुन याचे निदान व उपचार लवकरात लवकर करणे गरजेचे आहे.

आकडेवारी – ग्लोबोकॉनच्या २०२० चा आकडेवारीनुसार, स्तनाच्या कर्करोगाचे जागतिक स्तरावर २२,६१,४१९ नवीन रुग्ण आढळले व ६,८४,९९६ रुग्णांचा स्तनाच्या कर्करोगामुळे मृत्यु झाला. तसेच भारतात महिलांमध्ये निदान झालेल्या एकुण ६,७८,३८३ कर्करोगाच्या रुग्णांपैकी १,७८,३६१ (२६.३%) रुग्ण स्तनाच्या कर्करोगाचे होते. तसेच २०२० मध्ये भारतात, महिलांमध्ये कर्करोगाच्या ४,१३,३८१ मृतांपैकी ९०,४०८ (२१.९%) मृत्यु हे स्तनाच्या कर्करोगाचे होते. स्तनाच्या कर्करोगाचे प्राथमिक अवस्थेत निदान झाल्यास रुग्णास कमी हानी होते असे दिसुन येते. त्या करिता खालील प्रमाणे काही त्रास असल्यास, तज्ज्ञ डॉक्टरांकडुन योग्य ती तपासणी करुन घेणे आवश्यक आहे.

स्तनाच्या कर्करोगाची लक्षणे – स्तनाच्या कोणत्याही भागात गाठ तयार होणे, अथवा वेदना होणे, स्तनावर सुज येणे, जळजळणे अथवा डाग पडणे, स्तनग्रातुन रक्त येणे, लालसर होणे, वेदना होणे आत खेचले जाणे, स्तनांच्या आकारात बदल दिसणे. या सर्व लक्षणांवर, लक्ष देण्याकरिता सर्व महिलांनी स्वतःची स्तन तपासणी करणे गरजेचे आहे व योग्य वेळी डॉक्टरांकडुन स्तन तपासणी व गरज पडल्यास मॅमोग्राफी केल्यास स्तनाचा कर्करोग लवकरात लवकर निदान होण्यास मदत होते.

स्तन कर्करोग : जनजागृती व उपचार अभियान – दिनांक ०८ मार्च २०२३ रोजी वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार गिरीष महाजन यांच्याहस्ते, कामा व आल्बेस हॉस्पिटल मुंबई येथे स्तनाच्या कर्करोगाची जन जागृती व उपचार मोहिमेचे उदघाटन करण्यात आले. या मोहिमेंतर्गत बाह्यरूग्ण विभाग सेवा प्रत्येक आठवड्यात एके दिवशी (दर बुधवारी दुपारी १२ ते २ वाजेपर्यंत) महाराष्ट्रातील सर्व वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांमध्ये स्तनाच्या कर्करोगाची तपासणी साठी बाह्य रुग्ण विभाग सुरु करण्यात आले आहेत. या सुविधा देण्यासाठी शल्यचिकित्साशास्त्र विभागाकडे नोडल विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्या अनुषंगाने चिकित्सालयीन व सामाजिक स्तरावरील सुविधा देण्यात येतील.

रेडिओथेरपी, स्त्री रोग विभाग, विकृतीशास्त्र विभाग, क्ष किरण विभाग जनऔषधवैद्यकशास्त्र विभाग, नर्सिंग, भौतिकोपचार विभाग, समाजसेवा विभाग व इतर विभागाच्या संलग्न हा बाह्यरुग्ण विभाग चालवण्यात यईल. स्तनाच्या कर्करोगाचे प्राथमिक अवस्थेमध्ये निदान होण्यासाठी मॅमोग्राफी व इतर अद्ययावत उपकरणांचा उपयोग केला जाणार आहे. या बाह्य रुग्ण विभागात कार्यरत शल्यचिकित्सकाचे कौशल्य विकसित होण्यासाठी यांना आवश्यक प्रशिक्षण टाटा मेमोरियल हॉस्पिटल मुंबई येथे देण्यात येईल तसेच भविष्यात आवश्यकतेनुसार शासकीय कर्करोग रुग्णालय औरंगाबाद येथे ही प्रशिक्षण देण्यात येईल. रुग्णांना आवश्यक असल्यास केमोथेरपी व रेडीओथेरपी देण्यात येईल. रुग्णांसाठी समुपदेशन व पुनर्वसन केंद्र सुरु करण्यात येईल.

सोलापूरमध्ये या शिबिराचे उद्‌घाटन अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. उपअधिष्ठाता डॉ. आर. डी. जयकर हे या मोहिमेचे मुख्य नोडल अधिकारी आहेत. श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रूग्णालय, सोलापूर येथील बाह्यरूग्ण विभागातील ओपीडी नं 27 येथे दर बुधवारी दुपारी 12 ते 2 या वेळेत स्तन रोग निदान व उपचार शिबिर पुढील वर्षभर घेण्यात येणार आहे. मोहिमेच्या पहिल्या बुधवारी दि. 8 मार्च रोजी 80 महिलांची तपासणी करण्यात आली. सोलापूर शहरातील रेल्वे विभाग, बँकिंग, शैक्षणिक व अन्य क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिलांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी केले आहे.

संप्रदा बीडकर

जिल्हा माहिती अधिकारी, सोलापूर