मुंबई । प्रतिनिधी – जालना येथील मंजूर असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयास राज्य सरकारने आर्थिक तरतूद केलीच पाहिजे या प्रमुख मागणीसाठी जालन्याचे काँग्रेस आ.कैलास गोरंटयाल यांनी आज सोमवारी सकाळी मुंबई येथे विधानमंडळ पायर्यांवर बसून लक्षवेधी आंदोलन केले.दरम्यान,त्यांच्या या आंदोलनास विरोधी पक्षनेते अजितदादा पवार,माजी मुख्यमंत्री आ.अशोकराव चव्हाण,प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आ.नानासाहेब पटोले,राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री आ.जयंत पाटील,माजी मंत्री आ.बाळासाहेब थोरात,विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे,माजी मंत्री विजय वडेट्टीवार, माजी मंत्री आ. छगन भुजबळ, सपा नेते आ.अबू आझमी,आ.कुणाल पाटील यांच्यासह महाविकास आघाडीतील अनेक आमदारांनी भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा दिला.
जालन्यातील मंजूर असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयास राज्य सरकारच्या नुकत्याच सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात कोणतीही आर्थिक तरतूद ठेवली नाही. त्यामुळे काँग्रेस आ.कैलास गोरंटयाल यांनी राज्य सरकारच्या या अन्यायकारक निर्णयाविरुद्ध विधिमंडळाच्या अधिवेशनात आपण आक्रमक भूमिका घेणार असल्याचा इशारा देत वेळप्रसंगी आंदोलन देखील करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.संचालनालय वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन यांनी दि.21 फेब्रुवारी 2023 रोजी जालना येथील मंजूर असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयासाठी 25 हेक्टर जागेसह प्रस्ताव पाठवूनही राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात जालना येथील वैद्यकीय महाविद्यालयासाठी कोणतीही आर्थिक तरतूद ठेवली नाही.मात्र,जालना वगळून उर्वरित 10 जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालयांसाठी आर्थिक तरतूद करत जालना वासियांच्या तोंडाला पाने पुसली गेली. मराठवाडा विभागात केवळ जालना येथे वैद्यकीय महाविद्यालय नाही.जालन्यातील वैद्यकीय महाविद्यालयासाठी देखील राज्य सरकारने तात्काळ आर्थिक तरतूद करावी यासाठी आपण विधी मंडळाच्या अधिवेशनात आक्रमक भूमिका घेणार असल्याचा इशारा देत वेळप्रसंगी आंदोलन देखील करणार असल्याचे आ.कैलास गोरंटयाल यांनी स्पष्ट केले होते.या दिलेल्या इशार्या नुसार आ. कैलास गोरंटयाल यांनी आज सोमवारी सकाळी विधान मंडळाच्या पायर्यांवर बसून लक्षवेधी आंदोलन केले.यावेळी विधान परिषद सदस्य राजेश राठोड यांनी साथ देत त्यांच्या आंदोलनास पाठिंबा दिला.
जालन्यातील वैद्यकीय महाविद्यालयासाठी आपण राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला.तत्कालीन वैद्यकीय शिक्षण मंत्री आ.अमित देशमुख यांनी सकारात्मक प्रतिसाद देत जालना येथे तज्ञ अधिकार्यांचे पथक जालना येथे पाठवले होते.या पथकातील अधिकार्यांनी जालना येथील वैद्यकीय महाविद्यालयासाठी जागा निश्चित करून तसा प्रस्ताव सादर केला होता.मात्र,राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे – फडणवीस सरकारने ज्या जिल्ह्यात खाजगी वैद्यकीय महाविद्यालय आहेत अशाही ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करून अर्थसंकल्पात तरतूद ठेवली.मात्र,जालना येथे मंजूर करण्यात आलेल्या वैद्यकीय महा विद्यालयास अर्थसंकल्पात कोणतीही आर्थिक तरतूद न ठेऊन जालना वासियांवर एक प्रकारे अन्याय केला आहे.जालन्यात वैद्यकीय महा विद्यालयासाठी राज्य सरकारने तात्काळ आर्थिक तरतूद करावी यासाठी आपला संघर्ष सुरूच राहील असे आ. कैलास गोरंटयाल यांनी स्पष्ट केले.