जालना । प्रतिनिधी – श्रीक्षेत्र जांबसमर्थ येथील राष्ट्रगुरु श्री समर्थ रामदास स्वामींच्या देवघरातील श्रीरामप्रभू, सीतामाता, लक्ष्मणजी, हनुमंत व इतर देवी देवतांच्या मुर्ती अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या होत्या. राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री या नात्याने या मूर्ती तपासाकामी वेळोवेळी पाठपुरावा घेत मुर्तीचे शोध कार्य पोलिस दलाच्या माध्यमातून पूर्ण केल्याबद्दल समर्थ वंशज भूषण स्वामी यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे कृतज्ञता भेट घेतली. यावेळी आपण लवकरच जांबसमर्थ येथील श्रीराम मंदिरात येणार असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.
समर्थ वंशज तथा श्रीराम मंदिर जांब समर्थचे प्रमुख भूषण स्वामी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कृतज्ञता पत्र देऊन सन्मान केला. यावेळी सज्जनगड येथील श्री रामदास स्वामी संस्थानचे विश्वस्त अॅड.महेश कुलकर्णी, कण्हेरी मठाचे मठ प्रतिनिधी राजप्रसाद इनामदार, संस्थानचे कार्यप्रमुख रोहित जोगळेकर, नरेंद्र पुराणिक यांची उपस्थिती होती. यावेळी भूषण स्वामी यांनी सांगितले की, राष्ट्रगुरु श्री समर्थ रामदास स्वामींच्या देवघरातील शेकडो वर्षांची परंपरा आणि इतिहास असणार्या श्रीराम मंदिरामधील रामोपासना आणि सुर्योपासना गेल्या 33 पिढ्यांपासून अविरतपणे याठिकाणी सुरु असून आपल्या विशेष प्रयत्नाने चोरीचा तपास जलद गतीने पूर्ण झाला व रामदासी सांप्रदायाचा अमूल्य ठेवा जांबेमध्ये पुन्हा संस्थापित झाला. या आपल्या कार्याप्रती आम्ही सर्व समर्थभक्त, श्रीरामभक्त आणि रामदासी सांप्रदायीक परिवार अत्यंत कृतज्ञतापूर्वक ऋणी असल्याचे उपमुख्यमंत्र्यांना सांगितले.
अद्यापही एका महत्त्वाच्या मूर्तीचा शोध लागलेला नाही
श्री समर्थ रामदास स्वामी भिक्षेच्यावेळी आपल्या झोळीमध्ये ठेवत असलेली मारूतीरायांची मूर्तीचा शोध अद्याप लागलेला नाही असे भूषण स्वामी यांनी उपमुख्यमंत्र्यांना सांगितले. लवकर त्या मूर्तीचा शोध घेऊन ती मूर्ती मंदिरात आणण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
22 मार्चपासून श्रीराम मंदिरात उत्सव: भूषण स्वामी
साक्षात श्रीसमर्थ रामदास स्वामींचा ज्या मूर्तींना परीसस्पर्श झालेला आहे व प्रत्यक्ष प्रभू श्रीरामांनी ज्या मूर्ती समर्थांच्या वडिलांना श्री सुर्याजीपंतांना प्रसादरुपाने दिल्या आहेत, अशा श्रीराम मंदिरामध्ये यावर्षीचा रामनवमी उत्सव चैत्र शुद्ध पाडवा शके 1945 (बुधवार, दि.22 मार्च 2023) पासून चैत्र शुद्ध दशमी (दि.31 मार्च 2023) संपन्न होणार आहे. यावर्षी श्रीराम नवमी गुरुवार, दि.30 मार्च 2023 रोजी येत आहे. या दहा दिवसांमध्ये श्रीरामरायासमोर अनेक मान्यवरांचे कीर्तन, प्रवचन, रामकथा, उपासना, गायन आदी कार्यक्रम संपन्न होणार आहेत. अवघ्या महाराष्ट्रातून हजारो भाविक या दहा दिवसांच्या उत्सवात श्रीरामांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी जांबेत दाखल होत असतात. या उत्सव कालावधीमध्ये आपण श्रीरामरायांच्या दर्शनासाठी आवश्य यावे असे आवाहन भूषण स्वामी यांनी केले आहे.