जालना । प्रतिनिधी – घरगुती मसाल्यांचा घमघमाट परदेशात पसरविणार्या जालना येथील दिव्यांग दाभाडे दाम्पत्यांचा नुकताच विशेष गौरव करण्यात आला.
संतोष दाभाडे हे जालना जिल्हयातील भोकरदन तालुक्यातील टाकळी (बाजड) येथील रहिवाशी असून त्यांनी अगदी शून्यातून आपल्या मसाले उद्योगाची सुरुवात केली आणि उद्योग संचालनालयाच्या मार्फत मोठ्या कष्टाने जालना येथे सम्यक मसाला क्लस्टरची निर्मिती केली. हे सर्व करीत असतांना त्यांना खूप संघर्ष करावा लागला .परंतु मेहनत, धडपड आणि स्वतः वरचा आत्मविश्वास यामुळे त्यांनी हे सर्व शक्य करून दाखविले आहे. ते शासनाच्या विविध उद्योग प्रशिक्षण संस्थामध्ये मागील आठ दहा वर्षापासून मास्टर ट्रेनर म्हणून कार्यरत आहेत .या माध्यमातून अनेक उद्योजक घडविण्यासाठी ते प्रयत्न करीत आहेत. नविन उद्योजक व महिला बचत गटांना योग्य मार्गदर्शन करण्याचे कार्यही ते करीत आहेत.
नव उद्योजक घडविण्यासाठी पुढाकार घेणारे संतोष दाभाडे यांना नुकतेच बीड येथील पद्मपाणी प्रतिष्ठानच्या वतीने यशवंतराव चव्हान सभागृहात आयोजित कार्यक्रमात गौरविण्यात आले आहे.
मसाला उद्योगात संतोष दाभाडे यांना खंबीरपणे साथ देणार्या त्यांच्या पत्नी वंदना दाभाडे ह्या दिव्यांग आहेत. मसाला उद्योग उभारून मसाल्यांचा घमघमाट परदेशात पसरविणार्या दाभाडे दाम्पत्यांचा नुकताच औरंगाबाद येथील मौलाना आझाद संशोधन केंद्राच्या सभागृहात महामाया आधार सेवाभावी संस्थेच्या वतीने सौ. वंदना दाभाडे यांचा विशेष गौरव करण्यात आला. वंदना दाभाडे यांनी जालना शहरातील इंदिरानगर भागातील गरीब व कामगार महिलांचा बचत गट तयार करून त्या माध्यमातून आपल्या मसाल उद्योगाची सुरुवात केली. त्यांना भांडवल उभारणीसाठी खुप कष्ट सोसावे लागले आहे. एकाही राष्ट्रीयकृत बँकेने त्यांना कर्ज दिले नाही. तरीही न डगमगता हिंमतीने आपल्याच बचत गटाकडून अंतर्गत कर्ज घेवून उद्योगाला सुरुवात केली. विविध ठिकाणी प्रदर्शन मध्ये सहभागी होवून त्यांनी आपल्या मसाल्याची विक्री सुरु केली. देशभरात आयोजित प्रदर्शनात दाभाडे दाम्पत्य आपल्या घरगुती मसाल्यांचे ठेवतात. पणजी येथे आयोजित प्रदर्शनासाठीही दाभाडे दाम्पत्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. दाभाडे दाम्पत्यांचा विविध शासकीय व सामाजिक संस्थांनी पुरस्कार देऊन गौरव केला आहे.