जालना । प्रतिनिधी – आजच्या गढूळ राजकारणात एखाद्या पक्षाच्या विचारधारेने काम करण्याऐवजी कार्यकर्ते सत्ता, पैसा याच्या मागे धावतांना दिसतात. परंतु शिवसेनेच्या जालना जिल्ह्यातील स्थापनेच्या काळात अगदी झटून पक्ष उभा करण्यासाठी प्रचंड कष्ट उपासणारे स्व. किशनलाल काठोठीवाले यांच्या सारखे कार्यकर्ते आता दुर्मिळ झाले असल्याचे प्रतिपादन शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केले.
जालना येथील काद्राबाद परिसरातील उतारगल्ली येथे नगर परिषद व अहिर नवयुवक संघ जालनाच्या वतीने उभारण्यात आलेल्या स्व. किशनलालजी प्रेमचंद्रजी काठोठीवाले (बडे पहेलवान) स्मृती व्दाराचे लोकार्पण विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते व आमदार वैैलास गोरंट्याल, शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर, माजी आमदार संतोष सांबरे, श्री फुलचंद महाराज संत योगेश्वरवाले यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी पुढे बोलतांना चंद्रकांत खैरे म्हणाले की, स्व. किशनलाल काठोठीवाले हे एक आदर्श कार्यकर्ते होते. पक्षामुळे फार नाव मिळाले नाही. सत्ता मिळाली नाही, कधी नगरसेवक झाले नाहीत. परंतु त्यांनी संघटनेचा अभिमान मात्र कधीही सोडला नाही. आज राज्यात अनेकांना पक्षाने अनेक वेळा आमदार केले, मंत्री केले, पक्षाच्या नावावर प्रचंड संपत्ती कमवली. परंतु तरीही ते पक्षाशी एकनिष्ठ राहु शकले नाहीत. मात्र काठोठीवाले यांच्यासारखे कार्यकर्ते काहीही न मिळून शेवटच्या श्वासापर्यंत पक्षाची एकनिष्ठ राहिले त्यामुळे अशा लोकांचे विचार येणार्या पिढीला समजावेत म्हणून त्यांची स्मारक व्हावीत, त्यांच्या नावाने स्मृतीव्दार उभे केले हे अत्यंत कौतुकास्पद असल्याचे सांगत या कार्याबद्दल आमदार कैलास गोरंट्याल यांचे त्यांनी कौतुक केले.
विरोधी पक्षेनेते अंबादास दानवे म्हणाले की, आजच्या आव्हानात्मक काळात स्व. काठोठीवाले यांचे विचार व कार्य आम्हा सर्वांसाठी दिपस्तंभाप्रमाणे आहेत. त्यांच्या सारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या बळावरच पक्ष आज संकट काळातही भक्कमपणे उभा आहे. त्यांनी शिवसेनेच्या स्थापनेच्या काळात जिल्ह्यातील अनेक गावांत तांडे, वस्ती,वाड्यावर जावून पक्षाच्या शाखा स्थापन केल्या. त्यांनी घेतलेली प्रचंड मेहनत पुढे पक्षाला मजबुत करुन गेली. असे कार्यकर्ते लाभल्यानेच पक्ष मोठा होतो, असे सांगून भविष्यातही त्यांच्या मुलांनेही त्यांचा वारसा सक्षमपणे पुढे चालवावा. स्व. किशनलाल काठोठीवाले यांच्या नावाने उभारलेल्या स्मृतीव्दाराचे त्यांनी कौतुक केले.
यावेळी आमदार वैैलास गोरंट्याल म्हणाले की, स्व. किशनलाल काठोठीवाले एक चांगले कुस्तीपटू होते. शहरात कुस्त्यांच्या स्पर्धा आयोजित करण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहायचा. भविष्यात त्यांच्या स्मृतीनिमित्तही कुस्त्यांच्या स्पर्धा व्हाव्यात. असा मनोदय व्यक्त करुन स्व. किशनलाल काठोठीवाले हे एक दिलदार मित्र, शेजारी व चांगले समाजसेवक म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहत असे, अत्यंत मनमोकळा स्वभाव असल्याने त्यांच्याशी बोलतांना हास्याचे फवारे उडायचे. त्यांच्या स्मृतीनिमित्त प्रवेशव्दार उभारुन मी काही फार मोठे काम केलेले नाही. तर एका मित्राच्या स्मृती कायम लोकांच्या स्मरणात राहाव्यात यासाठी प्रयत्न केले असल्याचे गोरंट्याल यांनी सांगितले.
जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर म्हणाले की, स्व. किशनलाल काठोठीवाले यांच्याशी माझे अत्यंत घरोब्याचे संबंध होते. त्यांचा आम्हाला खुप मोठा आधार वाटायचा. जालना शहरात सामुहिक विवाह चळवळ उभारण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता तर होळी निमित्त फाग महोत्सव आयोजित करण्याचे श्रेयही मोठ्या प्रमाणावर त्यांनाच जाते. आम्ही राजकारणात करीत असलेल्या कामांचा त्यांना खुप अभिमान वाटायचा. अत्यंत सामान्य जीवन जगलेले स्व. काठोठीवाले यांनी ठरविले असते तर ते वेगळ्या मार्गानेही पैसे कमवू शकले असते. परंतु त्यांनी कधीही तत्वांशी तडजोड केली नाही. त्यांचे हेच संस्कार त्यांनी कुटूंबियांवर केले. आज त्यांचा मुलगा आमच्या सोबत शिवसेना शहरप्रमुख म्हणून काम करतो याचा आम्हाला खुप अभिमान असल्याचे अंबेकर म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना शिवसेना शहरप्रमुख दुर्गेश काठोठीवाले म्हणाले की,वडीलांनी आम्हाला दाखविलेल्या मार्गावर चालण्याचे बळ समाजाकडून मिळावे तसेच स्मृतीव्दारातून येता-जाता त्यांच्या स्मृती कायम आमच्या मनात जपल्या जाव्यात हा विचार घेवून स्मृतीव्दाराची उभारणी केली.
या स्मृतीव्दाराच्या उभारणीसाठी आमदार वैैलास गोरंट्याल, शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांनी मोलाचे सहकार्य केले असल्याचे सांगून उपस्थित मान्यवरांच्या आभार व्यक्त केले.
यावेळी रावसाहेब राऊत,मुरलीधर शेजुळ, शिवाजी शेजुळ, हरिहर शिंदे, बाला परदेशी,घनश्याम खाकीवाले, विजय चौधरी, रमेश गौरक्षक, अंकुश राऊत, नंदु मेघावाले, अशोक भगत, दिपक रणनवरे, दिपक भुरेवाल, देवचंद चौधरी, गणेशलाल चौधरी, कुंदनलाल काठोठीवाले,जीवन काठोठीवाले, धनराज बटावाले, भरत सांबरे, अनिल वाघमारे, विजय सेदलकर,सखाराम गिराम, गोवर्धन अग्रवाल, डॉ. रामप्रसाद शेळके,कचरु भगत, सुरेश बटावाले, बिहारी परदेशी, अनिल भुरेवाले,सर्जेराव जाधव, रतीलाल भगत, बजरंग राजपुत, बबन काजळे, नंदलाल भुरेवाले, ब्रिजु यादव, मोहन मेघावाले, विनोद गंजवाले, मुकूंद गुमनवाले, भवानी शंकर मानसिंगवाले,राजु काबलिये, धरम कपडेवाले, भोरलाल काबलिये, गोंपीचंद अग्रवाल, हितेश शहा, शरद जैस्वाल आदींची उपस्थिती होती.