संरक्षण, सुरक्षेच्या क्षेत्रात संबंध दृढ करण्यास उत्सुक – ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान ॲथोनी अल्बानीज

23

मुंबई : संरक्षण सज्जता आणि सुरक्षेच्या क्षेत्रातील भारताशी संबंध आणखी दृढ करण्यासाठी उत्सुक आहोत, असे ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान ॲन्थोनी अल्बानीज यांनी आज येथे सांगितले. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान श्री. अल्बानीज यांनी आज भारतीय नौदलाच्या आयएनएस विक्रांतला भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ॲडमिरल आर. हरिकुमार, व्हाईस ॲडमिरल दिनेश के. त्रिपाठी, कॅप्टन विद्याधर हरके, राजशिष्टाचार विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर आदी उपस्थित होते.

पंतप्रधान श्री. अल्बानीज म्हणाले की, ‘भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील संबंधांना परंपरा आहे. आम्हाला सहकार्याचे नव्या पर्वात प्रवेश करायचा आहे. यासाठी संरक्षण सज्जता, सुरक्षितता याचबरोबर परस्पर व्यापार आणि उद्योग आदी क्षेत्रातही सहकार्य करायचे आहे.’ पंतप्रधान श्री. अल्बानीज यांचे नौदलाचे प्रमुख ॲडमिरल आर. हरिकुमार यांनी स्वागत केले. तसेच त्यांना नौदलाच्या पथकाने मानवंदना दिली. पंतप्रधान श्री. अल्बानीज यांनी आयएनएस विक्रांतची सविस्तर माहिती घेतली. विक्रांतवरील युद्ध विमानात ( लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट) बसून माहिती घेतली. त्याचबरोबर त्यांनी विक्रांतवरील नौदलाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. ॲडमिरल आर हरिकुमार यांनी त्यांना आयएनएस विक्रांतची प्रतिकृती आणि क्रिकेटची बॅट भेट दिली.