ज्ञानाला सदगुणांची जोड दिली तरच आपण मोठे होऊ शकतो- जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर

25

जालना | प्रतिनिधी- ज्ञान महत्वाचेच व त्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे पण त्याला सद्गुणांची जोड ही अत्यंत महत्त्वाची आहे. महापुरुषांनी आपल्या प्रगतीसाठी ज्ञानाचे महत्त्व वारंवार आधोरेखितरित केले आहे पण
समाज हा ज्ञानाबरोबरच व्यक्तीच्या अंगी असणार्‍या चांगल्या गुणांमुळे  प्रभावित होतो. ज्ञानामुळे अनेकजण उच्चपदस्थ अधिकारी होतात पण ते जनतेबरोबर चांगले वागतात तेच लोकप्रिय होतात. हा त्यांच्या गुणांचाच प्रभाव असतो. असे शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले.
जागतिक महिला दिनानिमित्त जालना शहरातील कै.नागोजीराव सतकर प्राथमिक शाळेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय आघाडीच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनचरित्राचे
मोफत वितरण शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शाळेचे अध्यक्ष बाबुराव सतकर, डॉ.राजेश राऊत, राजकुमार मुंडे, प्रकाश बुधवंत यांची प्रमुख उपस्थिती होती.
वैद्यकीय क्षेत्रातील उदाहरण देताना ते म्हणाले की, या क्षेत्रातील ज्ञान अनेक डॉक्टरांकडे असते पण काहीच डॉक्टर मात्र आपल्या वागण्या बोलल्याने समोरच्या व्यक्तीचे निम्मे दुःख हलके करीत असतात. प्रचंड ज्ञान असूनही जर
त्याचा उपयोग समजला होत नसेल तर ते ज्ञान कुचकामाचे आहे समाजात कसे वागावे बोलावे हे कळले पाहिजे व आपल्या ज्ञान उपयोग समाजाला झाला पाहिजे तरच समाज आपला आदर करील हे ध्यानात घ्यावे. अनेकांना ज्ञानाचा, पदाचा अहंकार असतो अशी माणसं समजला नकोशी वाटतात. तर आदर, समर्पण, नम्रता, परिश्रम, जिद्द,चिकाटी असे गुण अंगी असतील तर समाज नक्कीच आपला आदर करील.
पुढे बोलताना आंबेकर म्हणाले की, आमच्या राजकीय क्षेत्रातही एखादी निवडणूक जिंकल्याने नव्हे तर आपल्या कर्तृत्व व सद्गुनामुळेच पुढे त्यांची ओळख राहत असल्याचे सांगितले. राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर ज्ञानाबरोबरच उत्तम गुणांचे ही संस्कार केले त्यामुळेच एकटे छत्रपती शिवाजी महाराज आजही रयतेचे जाणते राजे म्हणून लोकप्रिय आहेत व महाराजांच्या सद्गुणांचे अनेक प्रसंग आजही ऐकावयास मिळतात. तसेच महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज, राष्ट्रपिता महात्मा गांधी, लोकमान्य टिळक,  लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, राष्ट्रसंत गाडगेबाबा आदी महापुरुषांनी समाजापुढे आपले ज्ञान व
सद्गुणांचा आदर्श घालून दिला. त्यांच्या चरित्रांचे वाचन करण्याचे आवाहनही त्यांनी केले. यावेळी माया कांबळे, वकील रेखा कांबळे, कविता दाभाडे यांच्यासह मुख्याध्यापिका ठाकरे, शिक्षक वृंद व विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थित होते.