सर्वांचा एकच नारा, बालविवाह मुक्त करु जालना जिल्हा सारा ; जालना जिल्ह्यात बालविवाह निर्मुलनाची शपथ घेण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन 

15

8 मार्च रोजी सकाळी 11 वा. जागतिक महिला दिनी

जालना :  जालना जिल्ह्यात बालविवाहाची अनिष्ट प्रथा रोखण्यासाठी प्रशासन स्तरावरुन विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून बुधवार, दि. 8 मार्च 2023 रोजी “जागतिक महिला दिनी” सकाळी ठीक 11 वाजता जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या, शाळा, महाविद्यालये, ग्रामपंचायती, शासकीय व निमशासकीय आस्थापना / कार्यालयांमध्ये उपस्थित सर्व अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी,पालक व नागरीक आदी सर्वांनी बालविवाह निर्मुलनाची शपथ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केले आहे.

 बाल विवाह निर्मुलनाची शपथ/प्रतिज्ञा पुढीलप्रमाणे आहे

आम्ही जालनाकर अशी प्रतिज्ञा करतो की, मुलगी असेल तर १८ वर्षाच्या आत व मुलगा असेल तर २१ वर्षाच्या आत

आम्ही बाल विवाह करणार नाही.  बाल विवाहाच्या कोणत्याही कार्यात सहभागी होणार नाही,

तसेच बाल विवाहास प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष मदत करणार नाही.

बाल विवाहाने मुलांच्या शैक्षणिक, सामाजिक व शारीरिक आयुष्यावर दुष्परिणाम

होतात याची आम्हाला जाणीव आहे.

बाल विवाह हा कायदेशीर गुन्हा असुन त्यासाठी तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतुद आहे.

बाल विवाहाची माहिती मिळाल्यास आम्ही  १०९८ या क्रमांकावर संपर्क साधु.

या नंबरवर संपर्क साधणाऱ्या व्यक्तीचे नाव व पत्त्याची आवश्यकता नसून माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाते याची मला माहिती आहे

व या सामाजिक कामासाठी प्रशासनास संपूर्ण सहकार्य करु.

आम्ही आमच्या गावात, आजुबाजुला, शहरात बालविवाह होणार नाही याची  दक्षता घेऊ.

सर्वांचा एकच नारा, बालविवाह मुक्त करु जालना जिल्हा सारा..! जय हिंद जय महाराष्ट्र..!