जन औषधी हे वरदान असून कमी खर्चात आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी गुणकारी आहे – रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे

43

जालना : संपूर्ण भारत देशामध्ये जन औषधी दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे.  सर्वसामान्यांसाठी जन औषधी ही वरदान असून कमी खर्चात आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी गुणकारी आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रेल्वे, कोळसा, खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले.

जालना येथील अन्न व औषध प्रशासन विभाग आणि संभाजीनगर येथील  प्रधानमंत्री जनऔषधी केंद्राच्या संयुक्त विद्यमाने आज जालना शहरातील भोकरदन नाक्यावरील आयएमए हॉलमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.  कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अर्चना भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ. जयश्री भुसारे, भास्कर दानवे, भीमराव डोंगरे, सह. औषधी अधिकारी अन्न व औषधी प्रशासक वर्षा महाजन, नगर पालिकेचे मुख्याधिकारी संतोष खांडेकर  यांच्यासह संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री दानवे म्हणाले की, आपल्या देशात गरिबांना हक्क व सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. विविध  शासकीय कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून त्यांचा स्तर उंचावण्याचा नेहमीच प्रयत्न केला जातो. त्याचाच एक भाग म्हणून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून गरिबांना खाजगी मेडिकल दुकानावरुन अत्यंत माफक दरात जनऔषधी केंद्राच्या माध्यमातून औषधी उपलब्ध करुन देण्यात  येत आहेत. बऱ्याचशा लोकांना या जनऔषधी केंद्रातून मिळणाऱ्या औषधांची माहिती नाही, त्यामुळे त्याचा मोठया प्रमाणात प्रचार-प्रसार होणे आवश्यक आहे. अन्न व औषध प्रशासनाने अतिशय गतिमानतेने याचा प्रचार व प्रसिध्दी करण्यावर भर द्यावा, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. कार्यक्रमास औषध विक्रेता, नागरिकांची उपस्थिती होती.