जालना । प्रतिनिधी – यंदाचा कर्मयोगी स्व. अंकुशराव टोपे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ’ नागमणी’ जीवनगौरव राज्यस्तरीय पुरस्कार कवितेच्या समग्र योगदानाबद्दल जालना येथील प्रसिद्ध कवी प्रा. जयराम खेडेकर यांना घोषित करण्यात आला आहे. शनिवार दि.4 मार्च रोजी आयोजित कौतुक सोहळ्यात या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. उद्योजक शरद टोपे यांनी आज( दि. 2) पत्रकार परिषदेत उपरोक्त माहिती दिली. या पत्रकार परिषदेस मराठवाडा साहित्य परिषदेचे जालना जिल्हाध्यक्ष प्रा. रमेश भुतेकर, जाणीव अस्मितेची साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष राम गायकवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी अधिक माहिती देतांना शरद टोपे म्हणाले की, गेल्या दोन वर्षांपासून साहित्य, कला क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल कर्मयोगी स्व. अंकुशराव टोपे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ’नागमणी’ राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार दिला जात आहे. आयुष्यभर कवी, कलावंत यांचे पुरस्कार देऊन कौतुक करणारे शिवाय कवितेचा पाडवा या कार्यक्रमाच्या माध्यमातून जालना शहराचे नाव देशभर गाजविणारे प्रा. जयराम खेडेकर यांना त्यांच्या कवितेच्या समग्र योगदानाबद्दल यंदाचा’ नागमणी’ जीवनगौरव पुरस्कार घोषित करण्यात आला आहे.रोख एक लाख रुपये, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. शनिवार दिनांक 4 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजता जालना शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात माजी आरोग्यमंत्री आमदार राजेश टोपे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्राचार्य डॉ. रामलाल अग्रवाल यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
या जीवनगौरव पुरस्कारानिमित्ताने जळगाव येथील कवी प्रा. शशिकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली काव्यमैफलीचे आयोजन करण्यात आले असून या काव्यमैफलीत सांगली येथील कवी प्रा. सुभाष पाटील, माजलगाव येथील कवयित्री कविता बोरगावकर, केज येथील कवयित्री अमिता पैठणकर, सिंदखेड येथील कवयित्री ज्योती तायडे आदींचा सहभाग राहणार आहे.
जालना शहरातील साहित्य रसीक, श्रोत्यांनी या जीवनगौरव पुरस्कार वितरण व काव्यमैफलीस मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहनही शरद टोपे, प्रा. रमेश भुतेकर व राम गायकवाड यांनी यावेळी संयुक्तपणे केले.
या पत्रकार परिषदेस विश्वंभर भुतेकर, प्रा. अविनाश पवार, प्रा. गंगाराम परदेशी आदींची उपस्थिती होती.
प्रा. जयराम खेडेकर यांची साहित्यसंपदा
प्रा. जयराम खेडेकर यांचे ऋतुवंत (काव्यसंग्रह) ,भुई (काव्यसंग्रह) ,मेघवृष्टी (काव्यसंग्रह), रानझुले (ललित), रानफुले (काव्यसंग्रह) ,कवितेची जबसफुले (काव्यसंग्रह) ,तुझ्या स्पर्शातून पिसाळले संपूर्ण आयुष्याचे मोरपीस (काव्यसंग्रह) , गुळभेंडी (विनोदी लेख संग्रह), पारंब्या (ललित), मी कसे सांगू तुम्हाला अक्षरांनी (ललित), मुद्रा संकल्पीत सकल्प आत्मकथन प्रकाशित असून एकूण कवितेसाठी 23 पुरस्कार त्यांना प्राप्त आहेत.विविध विद्यापीठांसह, 10 वी, 12 वी अभ्यासक्रमात त्यांच्या कविता समाविष्ट आहेत. याशिवाय एक संध्याकाळ कवितेची, कवितेचा पाडवा, कोजागिरी पौर्णिमानिमित्त ’दुधात सांडले चांदणे’’, ऊर्मी राष्ट्रीय कविता महोत्सव, ऊर्मी साहित्य संमेलने, ऊर्मी कवी संमेलनाचे आयोजन प्रा. खेडेकर यांनी केले आहे. कवी कलावंतांसाठी 11 विविध राज्य पुरस्काराचे आयोजनही त्यांनी केले आहे. त्यांच्या उर्मी प्रकाशनाचे ऊर्मी त्रैमासिक आहे. कवी-कलावंतांचे कौतुक सोहळे कार्यक्रम, कथा कवितेला भेटली,काव्य मैफलीचे आयोजन त्यांनी केले आहे. प्रा. खेडेकर यांनी आज पर्यंत काव्यमैफलीचे देश- परदेशात एकूण 537 प्रयोग केले आहेत.