रोटरीच्या शिबिरात 125 रुग्णांवर यशस्वी प्लास्टिक सर्जरी

32

जालना । प्रतिनिधी – रोटरी क्लब ऑफ जालनातर्फे आयोजित शिबिरात 125 गरजू रुग्णांवर मोफत प्लास्टिक सर्जरी करून त्यांच्या चेहर्‍यावर हास्य फुलविण्यात आले.
गेल्या 20 वर्षापासून हे शिबिर आयोजित करण्यात येत आहे. यावर्षी दि. 18 ते 28 फेब्रुवारीदरम्यान आयोजित या शिबिरात जर्मन देशातील डॉ. गेरहार्ड व त्यांच्या नेतृत्वाखालील टीम तसेच मुंबई येथील प्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉक्टर अनिल टिबडेवाल यांनी दुभंगलेले ओठ, टाळू व जळीत अशा एकूण 125 रुग्णांच्या मोफत शस्त्रक्रिया केल्याची माहिती रोटरी क्लब ऑफ जालनाचे अध्यक्ष किशोर देशपांडे यांनी दिली. मागील 20 वर्षांपासून 18 शिबिरांच्या माध्यमातून रोटरी क्लब जालनातर्फे आतापर्यंत 3200 गरजू रुग्णांची मोफत प्लास्टिक सर्जरी करून देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
शिबिराच्या समारोपप्रसंगी जर्मन डॉक्टर टीमचे प्रमुख डॉ. गेरहार्ड यांनी मनोगत व्यक्त करताना, यापुढेही दरवर्षी शिबिरासाठी येत जाऊ, असे सांगितले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी जालना मिशन हॉस्पिटलचे अधीक्षक डॉ. सी.डी. मोजेस, प्रकल्प प्रमुख अभय नानावटी, शिवपाल शर्मा, प्रसाद राव, क्लबचे सचिव प्रशांत महाजन व सर्व रोटरी सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. शिबिराच्या समारोपप्रसंगी रुग्ण व त्यांचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.