जालना । प्रतिनिधी – शहरातील मुख्य बाजारपेठेतील टांगास्टॅण्ड ते जनार्धन मामा चौक या मुख्य मार्गावर दोन्ही बाजुंनी असलेल्या दुकानांसमोर थाटलेल्या दुकानदारीमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. दिवसभर कमी अधिक प्रमाणात येथे वाहतुकीचा खोळंबा नित्याचाच विषय झाला आहे. तर सायंकाळी आणि रात्री आठ-नऊ वाजेदरम्यान तर त्यात आणखीच भर पडलेली पहावसाय मिळते आहे. मुख्य बाजारपेठ असल्यामुळे खरेदीसाठी येथे ग्राहकांची नेहेमीच वर्दळ असते. त्यातच शहरातील हा मुख्य रस्ता आहे. परिणामी रस्त्यावर ये-जा करणार्या वाहनधारकांची संख्या मोठी आहे. बाजारातील दुकानांसमोर थाटलेल्या दुकानदारीमुळे तसेच अस्ताव्यस्त लावण्यात येणार्या वाहनांमुळे या रस्त्यावरून मार्गक्रमण करतांना वाहनधारकांना अडथळे निर्माण होतात. या परिसरात नेहेमीच वाहतुकीचा खोळंबा पहावयास मिळतो. या मुख्य रस्त्यावरील दुकानांसमोर अनेक दुकानांनी स्वतःचे बोर्ड-फलक बाहेर ठेवलेले आहेत. काहींनी तर आपला विक्रीचे सामान-साहित्यही बाहेर ठेवलेले दिसून येते. तर काही दुकानांनी आर्थिक फायद्यासाठी फेरीवाले तसेच इतर व्यवसायिकांना जागा दिली आहे. या गंभीर विषयाकडे पालिकेसह वाहतुक शाखेने लक्ष देण्याची गरज आहे.