जालना- जालन्यात मध्यरात्री रोडवर टवाळखोरांकडून धुडगूस घातल्याचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. टवाळखोरांकडून कचेरी रोडवर दोघांना मारहाण करण्यात आली होती. दरम्यान, या प्रकरणी दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करीत कदीम जालना पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेराच्या मदतीने चौघांना अटक केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि. 28 फेब्रुवारी रोजी लग्न समारंभ आटोपून रात्री संदीप लिंगायत आणि अक्षय गवळी हे घराकडे जात होते. त्यावेळी कचेरी रोडवर पाच ते सहा जण उभे होते. त्यावेळी त्यांनी या टवाळखोरांना हटकले असता. त्यांनी या दोघांवर हल्ला केला. दोघांना पाच ते सहा जणांना फिल्मीस्टाईल मारहाण केली. या मारहाणीत दोघे जण जखमी झाले असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, या प्रकरणी संदीप लिंगायत यांच्या फिर्यदिवरून कदीम जालना पोलीस ठाण्यात कलम 307, 326, 324, 323, 504, 143, 146, 147, 148, 149, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या मारहाणीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली होती. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावण्यात कदीम जालना पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेराच्या मदतीने चौघांना अटक केली आहे तर एक आरोपी अद्यापही फरार आहे. पोलिसांनी अटक केलेल्या चार आरोपीना आज न्यायालयात हजर केले असता त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर दोन आरोपी अल्पवयीन असल्याने त्यांना बाल सुधारगृहात पाठवण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
हि कारवाई कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सय्यद मजहर, पोलीस उप निरीक्षक नागरे, पोकॉ सय्यद खलील, रामेश्वर राऊत, संदीप चव्हाण, अजीम अन्सारी यांनी केली आहे.