ड्रोनदारे बांबूवर औषधी फवारणीचा जालना जिल्ह्यात पहिलाच प्रयोग; नॅनो तंत्रज्ञान ठरेल शेतकऱ्यांसाठी वरदान- डॉ. सुयोग कुलकर्णी

54
जालना | प्रतिनिधी – ड्रोनद्वारे बांबू शेतीवर नॅनो तंत्रज्ञानाचा वापर करून औषधी फवारणीचा जिल्ह्यातील पहिला प्रयोग जालना तालुक्यातील खरपुडी येथील प्रगतशील शेतकरी सुयोग कुलकर्णी यांच्या कुलकर्णी फार्मवर पिक पाहणी कार्यक्रमानदरम्यान करण्यात आला.
        याप्रसंगी डॉ. सुयोग कुलकर्णी, इफकोचे अशोक साकळे, योगेश शिंदे व पंचक्रोशीतील शेतकरी उपस्थित होते. यावेळी बांबू शेत पिकावर ड्रोनद्वारे औषध फवारणी करण्याचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. जालना जिल्ह्यात बांबूवर नॅनो तंत्रज्ञानावर आधारित प्रथमच अशा प्रकारचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. उपस्थित शेतकऱ्यांनी या नवीन तंत्रज्ञानाची माहिती जाणून घेतली. जेथे हॅन्ड पंप अथवा पेट्रोल पंपाद्वारे एक एकर शेती फवारणीसाठी एक तास लागतो तेथे ड्रोन द्वारे फक्त 7 मिनिटात एक एकर शेती फवारणी करता येते, हे प्रात्यक्षिकातून विशद करण्यात आले. ड्रोनद्वारे औषधी फवारणीमुळे वेळ, पैसा आणि श्रमाचीही बचत होते, असे त्यांनी विविध उदाहरणाद्वारे पटवून देण्यात आले.
     यावेळी डॉ. सुयोग कुलकर्णी म्हणाले की, रासायनिक खताच्या भडीमारामुळे जमिनीचा पोत खालावत असून प्रदूषित होत चालला आहे. ही हानी टाळून येणाऱ्या काळात जमिनीचे प्रदूषण वाढू द्यायचे नसेल तर केंद्र सरकारच्या धोरणानुसार तयार करण्यात आलेल्या नॅनो तंत्रज्ञानाचा वापर अपरिहार्य बनला आहे. युरिया खताचा वापर करताना 20 ते 30 टक्केच खत उपयोगी येते. त्याऐवजी द्रव्य स्वरूपातील नॅनो युरिया, नॅनो डीएपी ड्रोनद्वारे अथवा ड्रीपद्वारे दिल्यास शंभर टक्के फायदा होतो आणि एकूण खर्चात 20 टक्के बचतही होते. त्यामुळे येणाऱ्या काळात नॅनो तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विशेष म्हणजे शेतकरी उत्पादक कंपन्याना औषधी फवारणीचे ड्रोन 75 टक्के तर शेतकरी गटांना 40 टक्के सबसिडीवर उपलब्ध करून दिले जातात, अशी माहिती डॉ. सुयोग कुलकर्णी यांनी दिली.