अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीचा आढावा अंमली पदार्थाची चोरट्या मार्गाने होणारी वाहतुक संपुर्णत: थांबविण्यासाठी नेहमी दक्ष रहावे – जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड

23

जालना :- व्यसनाधीनता ही समाजाला लागलेली किड आहे. व्यसनाधीनता हा एक आजार असून जिल्हा व्यसनमुक्तीच्या दिशेने मार्गक्रमण करण्याच्या उद्देशाने सर्व यंत्रणांनी अंमली पदार्थाच्या वापराला आळा घालण्यासाठी प्रत्येक ठिकाणी चोख लक्ष ठेवावे, तसेच अंमली पदार्थाची चोरट्या मार्गाने होणारी वाहतूक संपुर्णत: थांबविण्यासाठी नेहमी दक्ष रहावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांनी दिले. अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीची जिल्हाधिकारी कार्यालयात आज बैठक संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. बैठकीस उपविभागीय अधिकारी संदिपान सानप, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक एम.एन. झेंडे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी सरस्वती भोजने, अन्न औषध प्रशासनाच्या वर्षा महाजन, डाक विभागाचे अमोल स्वामी, शिक्षणाधिकारी आर.एम.जाखाल, जिल्हा रुग्णालयाचे डॉ.संजय मेश्राम यांच्यासह  संबंधित यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी म्हणाले की, जिल्ह्यात व्यसनमुक्तीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी टपाल तसेच कुरिअर सेवेतील वस्तुंची टपाल विभागातील अधिकाऱ्यांनी काटेकोर तपासणी करत वेळोवेळी विशेष लक्ष देवून संशयीत पार्सलची तपासणी करावी. पोलिस व दारुबंदी विभागाने ट्रॅव्हल्स व कुरिअरच्या ठिकाणी विशेष मोहिमा राबवित  तपासणी करावी. जिल्हा शल्य चिकित्सक, समाज कल्याण अधिकारी व शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांनी केलेली कार्यवाही व पोलिस व दारुबंदी विभागाने मागील महिन्यात केलेल्या कार्यवाहीचा सविस्तर आढावा घेवून जिल्हाधिकारी यांनी योग्य त्या सुचनाही यावेळी दिल्या.