जालना । प्रतिनिधी – सन 2020-21 मधील एएमसी (3054) या योजनेतील कामे न करता परतूर तालुक्यात धनादेश उचलण्यात आल्याची तक्रार विजय यादव लोणीकर यांनी कार्यकारी अभियंता सा. बांधकाम विभाग जालना (2) यांच्याकडे केली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात येऊन संबंधीतांवर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
या संदर्भात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, सन 2020-21 मध्ये एएमसी (3054) या योजनेतुन अंबड पाथरी रस्त्यावर 4 किलोमीटरमध्ये शारदा म.सं संस्था ढोकमाळ तांडा, ता. परतूर या सोसायटीच्या नावावर रा. मा. 61 किमी 204-200 वरील पुल दुरूस्ती साठी 2 लाख 27 हजार 832 रुपये, रा.मा. 61 किमी 203-700 वरील पुल दुरूस्ती 2 लाख 40 हजार 285 रुपये, रा.मा. 61 किमी 203-00 वरील पुल दुरुस्ती 2 लाख 19 हजार 422 रुपये, रा. मा. 61 किमी 206-900 वरील पुल दुरुस्ती 2 लाख 30 हजार 82 रुपये, रा.मा. 61 किमी 206-900 वरील पुल दुरूस्ती 2 लाख 49 हजार 684 रुपये, राम. मा. 61 किमी 204-400 वरील पुल दुरूस्ती 2 लाख 94 हजार 67 रुपये असे अंबड पाथरी रस्त्यावर आष्टी ते रायगव्हाण सरहद 4 किमी मध्ये एकूण 14 लाख 61 हजार 327 रुपयांची रक्कम कामे न करता उचलण्यात आली आहे. 206 ते 900 किलोमीटर एका पुलाच्या दुरुस्तीसाठी एकाच एंजन्सीच्या नावावर दोन वर्क ऑर्डर एका तारखेमध्ये काढण्यात आल्या असल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
तसेच सातोना आष्टी रस्ता प्रजिमा 36 किमी 400 ते 1400 (0.00 ते 2.00 मध्ये) रोड फरनिचर बसवणे 2 लाख 98 हजार 760 रुपये, रा मा 173 ते गुंज सावरगाव ते लोणी फाटा रस्ता प्रजिमा 31 किमी 21-00 ते 25-500 (13.500 ते 25.500) मध्ये रोड साईड फरनिचर बसवणे 2 लाख 95 हजार 665 रुपये, पांडे पोखरी ते आसनगाव रामा 61 को हदगाव पिंपळी धामणगाव सावरगाव रस्ता प्रजिमा 30 किमी 0.00 ते 4.500 या कामासाठी 2 लाख 88 हजार 558 रुपये, रा मा 223 दैठणा माव पाटोदा पांडेपोखरी ते रा मा 61 2.00 ते 4.500 साईड फरनिचर बसवणे 2 लाख 81 हजार 451 रुपये ही कामे करतांना सोसायटीने केवळ 20 टक्के काम करून 100 टक्के बिल उचलले असल्याचा गंभीर आरोप तक्रारीत विजय लोणीकर यांनी केली आहे.
या कामांची चौकशी करून सोसायटीला काळ्या यादीत टाकावे व शासनाची तिजोरी रिकामी करून स्वतःचा खिसा भरणार्या यंत्रणेवर कठोर कारवाई करावी या प्रकरणाची चौकशी न झाल्यास लोकशाही पद्धतीने उपोषणाचा इशाराही शेवटी दिला आहे. तक्रारीवर विजय यादव लोणीकर यांची स्वाक्षरी आहे.