जालना : जालना येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रात 450 नवप्रविष्ठ पोलिस प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेत असून पोलिस प्रशिक्षण केंद्रामार्फत नेहमीच विविध सामाजिक विषयांवर प्रबोधनपर उपक्रम वेळोवेळी राबविण्यात येत असतात. बालविवाह प्रतिबंध कायद्याबाबत जनसामान्यात प्रभावीपणे जनजागृती व्हावी या उद्देशाने जालना शहरातून रॅली शुक्रवारी काढण्यात आली. या जनजागृतीपर रॅलीने शहरवासियांचे लक्ष वेधून घेतले.
जालना पोलिस प्रशिक्षण केंद्राच्यावतीने बालविवाह प्रतिबंध कायद्याची जनतेमध्ये जनजागृती व्हावी या अनुषंगाने जनजागृती रॅली शुक्रवार दि.24 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 9 वाजता पोलिस प्रशिक्षण केंद्र येथून 450 पोलिस प्रशिक्षणार्थ्यांची रॅली काढण्यात आली. रॅलीस पोलिस प्रशिक्षण केंद्रापासून सुरुवात होवून मिशन हॉस्पिटल, राम मंदिर मार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते झाशीची राणी चौकात येवून रॅलीचा समारोप करण्यात आला. बालविवाह प्रतिबंध कायद्याबाबतची रॅली प्राचार्य अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली. या कार्यक्रमास पोलिस निरीक्षक श्री.मेहत्रे, श्री.भारती, इद्रीस शेख, जिल्हा माहिती कार्यालयाचे अनिल परदेशी, सी.आर.बरकुंट, जे.एस.फारुकी, श्री.जावेद, श्री.केंद्रे, ट्राफिक पोलिस अंमलदार श्री.निकम आदींची उपस्थिती होती.
चित्ररथाद्वारे बालविवाहास प्रतिबंध कायदा व जबाबदाऱ्यांची माहिती ग्रामीण भागातील लोकांना देण्याचे अमुल्य कार्य केले जात असून या चित्ररथात बालविवाहमुक्त जालना जिल्हा अभियान फ्लेक्ससह श्राव्य संदेशाचाही समावेश करण्यात आलेला असल्याने जिल्हा माहिती कार्यालयाने तयार केलेल्या चित्ररथ सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. जिल्ह्यात बालविवाह प्रतिबंध कायदा व जबाबदाऱ्यांची जनमाणसांत प्रभावीपणे जनजागृती व्हावी या उद्देशाने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून भावी पोलिसांना या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी बालविवाह प्रतिबंध कायद्याची जनजागृतीपर रॅलीस अभूतपुर्व प्रतिसाद लाभला.