जालना । प्रतिनिधी – बदनापूर तालुक्यातील चनेगावमध्ये गावाला वीजपुरवठा करणारी विद्युत डीपी जळाली असून दुरुस्तीसाठी ही डीपी महावितरण कार्यालयाकडे पाठवण्यात आली आहे. मात्र, महावितरणच्या अधिकार्यांकडून ग्रामस्थांना डीपी देण्यात टाळाटाळ केल्या जात आहे. त्याच्या निषेधार्थ आज शनिवारी(दि.25) रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जालना येथील महावितरण कार्यालायात अन्नत्याग आंदोलन करण्यात आले.
सध्या 12 वीच्या परीक्षा सुरु आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना विजे अभावी अंधारातच अभ्यास करावा लागतो. अंधारामुळे मच्छरांचा देखील उच्छाद वाढला आहे. त्यामुळे अन्न त्याग आंदोलन करून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने महावितरणचा निषेध नोंदवण्यात आला. शहरातील मस्तगड भागातील महावितरण कार्यालयासमोर हे आंदोलन करत महावितरण विरोधात घोषणाबाजी करत डीपी देण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी निवृत्ती महाराज शेवाळे, अशोक मुटकुळे, रामेश्वर निहाळ,पंजु शेवाळे, मंगेश बळप,देवराव घुगे, प्रल्हाद घुगे, आकाश शेवाळे, निवृत्ती सानप, कडूबा तायडे, शालीक तायडे आदींसह इतरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.