जालना – महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून ‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमातंर्गत जालना जिल्ह्यातील तक्रारींची जनसुनावणी गुरुवार, दि. 2 मार्च 2023 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, जालना येथे सकाळी 11 वाजता होणार असून आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि आयोगाच्या सदस्या या स्वत: तक्रारींची सुनावणी घेणार आहेत. तरी जालना जिल्ह्यात होणाऱ्या जनसुनावणीस अधिकाधिक महिलांनी पुढे येऊन, न घाबरता आपल्या तक्रारी यावेळी मांडाव्या, असे आवाहन आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केले आहे. बैठकीनंतर अध्यक्षा रुपाली चाकणकर या जालना जिल्ह्याची आढावा बैठक घेणार आहेत. यावेळी जिल्हाधिकारी, कामगार आयुक्त, पोलिस अधीक्षक तसेच आरोग्य, परिवहन, शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित असतील. सर्व कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालय, जालना येथे होणार आहेत.
महाराष्ट्र राज्य महिला आयोग महिलांच्या सक्षमीकरणासाठी अविरत कार्यरत आहे. महिलांना त्यांच्या जिल्ह्याच्या ठिकाणी न्याय मिळावा यासाठी ‘महिला आयोग आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये विभाग स्तरावर महिलांच्या तक्रारीचे निवारण करण्याचा प्रयत्न आहे. या जनसुनावणीवेळी पोलीस, प्रशासन, विधी सल्लागार, समुपदेशक, जिल्हा समन्वयक उपस्थित राहणार आहेत.
ग्रामीण भागातील महिलांना मुंबई कार्यालयात येऊन तक्रार करणे, सुनावणीसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहणे आर्थिकदृष्ट्या तसेच इतर कारणामुळे शक्य होत नाही. त्यांना या उपक्रमाचा फायदा होणार आहे. महिला आयोग आपल्या दारी अंतर्गत सुनावणी दरम्यान नव्या तक्रारीवर त्याच ठिकाणी कार्यवाही करण्यात येते. त्यामुळे आपली कैफियत मांडणाऱ्या महिलांना त्वरित दिलासा देण्याच काम आयोगाद्वारे करण्यात येत आहे, असे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.