जालना । महामानवांबद्दल सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करणारे राज्यपाल,भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते, यांच्या निषेधार्थ 07 डिसेंबर रोजी पुकारलेला जिल्हा बंद, तसेच खा. छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रस्तावित आंदोलनाच्या समर्थनार्थ रणनीती ठरविण्यासाठी मराठा क्रांती मोर्चा तर्फे बुधवारी ( ता. 30) दुपारी 01.00 वा. सर्व पक्ष, समविचारी संघटनांची जिल्हास्तरीय व्यापक बैठक आयोजित करण्यात आली आहे.
भाग्यनगर परिसरातील मराठा सेवा संघ कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत सर्व जाती, धर्मातील प्रमुख मान्यवर, उद्योग, व्यापार, शिक्षण, सहकार, सर्व पक्ष,सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक संघटनांचे प्रतिनिधी, शासकीय, निमशासकीय अधिकारी, कर्मचारी, महिला, युवक, जिल्हाभरातील समाज बांधव सहभागी होणार आहेत. आगामी जिल्हा बंद, तसेच खा. उदयनराजे भोसले यांच्या दि. 03 डिसेंबर रोजी रायगड येथे होणाऱ्या आंदोलनाच्या समर्थनार्थ जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या आंदोलनाची व्युव्हरचना ठरविण्यात येणार असून व्यापक चर्चा, विचारविनिमय केला जाणार आहे तरी सर्व समाजबांधवांनी मोठ्या संख्येने बैठकीत सहभागी व्हावे असे आवाहन मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आले आहे.