बुधवारी नाशिक येथे उध्दव ठाकरेंच्या उपस्थितीत संभाजी ब्रिगेडचा वर्धापनदिन सोहळा

प्रदेश कोषाध्यक्ष संतोष गाजरे यांची माहिती

12

जालना । छत्रपती शिवराय, म. फुले ,शाहू ,आंबेडकर या महामानवांच्या विचारांवर आधारित वैचारिक, कृतीशील संघटन म्हणून तीन दशकांपासून कार्यरत असलेल्या संभाजी ब्रिगेडचा 31 वा वर्धापनदिन सोहळा शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी ( ता. 30) नाशिक येथे आयोजित करण्यात आला असून या वेळी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत रणनीती आखण्यात येईल. अशी माहिती संभाजी ब्रिगेडचे प्रदेश कोषाध्यक्ष संतोष गाजरे पाटील यांनी सोमवारी ( ता. 28)दिली.

बुधवारी दुपारी तीन वाजता नाशिक येथील मुंबई नाका परिसरात स्थित कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहात आयोजित वर्धापन दिन सोहळ्यास संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे, महासचिव सौरभ खेडेकर, मुख्य प्रवक्ते प्रा. गंगाधर बनबरे यांच्या सह राज्यातील प्रमुख नेते व पदाधिकारी उपस्थित राहणार आहे. असे नमूद करत संतोष गाजरे पाटील म्हणाले, लोक सहभाग आणि जनतेच्या मूलभूत हक्कांसाठी निवडणूका लढवून राजसत्ता काबीज केल्याशिवाय जनतेच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक विकास साध्य होणार नाही. अशी संभाजी ब्रिगेडची धारणा असून जनतेच्या न्याय हक्कांसाठी निवडणुका लढविण्याकरता राजकीय पक्ष म्हणून संभाजी ब्रिगेडने घोडदौड सुरू ठेवली असल्याचे संतोष गाजरे पाटील यांनी स्पष्ट केले.
राज्यातील अनेक ज्वलंत प्रश्नांवर संभाजी ब्रिगेडने वेळोवेळी आक्रमक आंदोलने करून न्याय मिळवून दिला असून पुरोगामी विचारांचे संघटन म्हणून संभाजी ब्रिगेडचा नावलौकिक आहे. असे सांगून संतोष गाजरे पाटील म्हणाले, वर्धापन दिन सोहळ्यात शाहिरी जलसा, मान्यवरांचे मार्गदर्शन ,आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत रणनीती ठरविली जाईल तसेच तळा-गळात पक्ष संघटन वाढ होण्यासाठी कृतिशील कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे. यातून नवी दिशा मिळेल असा विश्वास संतोष गाजरे पाटील यांनी व्यक्त केला.